कागवाड विभागीय शिक्षणाधिकारी वलयातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी आणि कलोत्सव स्पर्धेचे आयोजन आमदार श्रीमंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

गुरुवारी उगार येथील श्रीहरी विद्यालय विहार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभा कारंजी स्पर्धा आणि कलोत्सवाचे उदघाटन आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर उपस्थितांना उद्देशून बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, प्रत्येकामध्ये असणाऱ्या विशेष कलेचा, गुणांचा वापर होणे आवश्यक आहे. आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी सरकार दरवर्षी प्रतिभा कारंजी स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

याचप्रमाणे तहसीलदार राजेश बुरली यांनी सरकारच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिभा कारंजी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करावी, असे आवाहन केले.
कागवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभा कारंजी स्पर्धेत ४८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कला सादर केली. गीतगायन, चित्रकला, वेशभूषा, जानपद नृत्य, कव्वाली, क्विझ यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कागवाडचे विभागीय शिक्षणाधिकारी एम आर मुंजे यांनी स्वागत करून प्रतिभा कारंजी स्पर्धेबद्दल माहिती दिली.
यावेळी जिल्हा नोडल अधिकारी विजय काळे, तालुका नोडल अधिकारी एस बी पाटील, बी आर सी, के एस खडाखडी, जिल्हा विषय निरीक्षक एस आय हुगार, शारीरिक शिक्षण संयोजक एम एस पुजारी, उगार नगरपालिका मुख्याधिकारी सुनील बबलादी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एम ए संकपाळ, तालुका कर्मचारी संघाचे अध्यक्ष गौडाप्पा सड्डी, श्रीहरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीप्ती भोसले, सिद्दराम मोटगी, नगरपालिका सदस्य प्रफुल थोरुषे, सुजय फराकट्टे, अशोक कांबळे, राकेश पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments