शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या उसाला योग्य भाव देण्यात यावा, उसाचा भाव निश्चित करूनच कारखाने सुरु करण्यात यावेत, कारखान्यासमोरील फलकावर निश्चित केलेली किंमत जाहीर करून प्रसारमाध्यमांसमोर जाहीर करावे, भाव निश्चित न करता कारखाना सुरु केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देत आज चिकोडी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले

यासंदर्भात शेतकरी संघाचे नेते त्यागराज कदम बोलताना म्हणाले, ऊस गाळपासाठी साखर कारखाने तयार झाले असून उसाचा भाव निश्चित करून कारखान्यांनी, थकबाकी भरून कारखाने सुरू करावेत. साखर कारखानदारांनी उसासाठी शासनाने ठरवून दिलेली किंमत तसेच उर्वरित रक्कम द्यावी व कारखान्यांनी चालू वर्षातील उसाचा भाव जाहीर करावा. सदर भाव प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर करावेत. अन्यथा कारखान्यासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. पंपसेटवर मीटर लावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
अथणी रयत संघाचे नेते महादेव मडिवाळ बोलताना म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे म्हटले जाते. मात्र शेतकऱ्यांबाबत सरकारला किंचतही काळजी नाही. ऊस दर निश्चितीसोबतच शेतकऱ्यांच्या इतर मागण्याही पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सिद्राम करगावे, पारिश यळगूड, अजाप्पा मंटूर, लक्ष्मण होसट्टी, शंकर हेगडे आदींसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments