खानापूरात सुरु असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त मलप्रभा क्रीडांगणावर गुरुवारी माऊलीच्या अश्वांचा टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य रिंगण सोहळा पार पडला.

खानापूर शहरात १७ सप्टेंबरपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त काल गुरुवारी सायंकाळी माऊलीच्या अश्वांचा टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य रिंगण सोहळा पार पडला. मलप्रभा क्रीडांगणावर झालेल्या या सोहळ्याला संपूर्ण खानापूर तालुक्यातील तसेच बेळगाव व अन्य भागातील हजारो वारकऱ्यांनी हजेरी लावली. आधी खानापूर शहरातून शितोळे सरकार,अंकली यांच्या दोन अश्वांसह दिंडी काढण्यात आली. रवळनाथ मंदिरापासून हभप नानासाहेब वासकर महाराज तसेच हभप प्रभू वासकर महाराज यांचे अधिष्ठान व मार्गदर्शन या सोहळ्याला लाभले. मार्केट, चिरमुरकर गल्ली, स्टेशन रोड, शिवस्मारक, बेळगाव-गोवा महामार्ग या मार्गे मलप्रभा क्रीडांगणावर दिंडी पोहोचली. दिंडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन अश्वांनी रिंगण पूर्ण करून विठ्ठल भक्तांची मने जिंकली. यावेळी वारकरी आणि विठ्ठल भक्तांनी माऊलीचा एकच जयघोष केला.


Recent Comments