Khanapur

लैला शुगर्सकडून शेतकऱ्यांना गणपती भेट

Share

गणेशोत्सवानिमित्त भेटीदाखल शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे, अशी माहिती महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी दिली.

खानापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. २०२१-२२ हिवाळी हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना 2,५०० रुपयांचा पहिला हप्ता सुरुवातीलाच देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात ऊस तोडणी समाधानकारक असल्याने गणेशोत्सवासाठी म्हणून १७५ रुपयांचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. लैला साखर कारखाना गेल्या चार वर्षांपासून महालक्ष्मी समूहामार्फत चालवला जातो. २०१८ -१९ मध्ये २ लाख २० हजार टन गाळप झाले तर २०१९ -२० मध्ये २ लाख १० हजार टन गाळप झाले. योग्य नियोजन करून २०२० -२१ मध्ये ३ लाख टनांचे उद्दिष्ट गाठण्यात आले असून गेल्या हंगामात ३ लाख ८ हजारांचा टप्पा पूर्ण झाला होता. पुढील हंगामात दररोज ४००० टन गाळप केली जाणार असून ५ लाख टन गाळप करण्याची योजना आखण्यात आली आहे. इथेनॉल प्रकल्पही लवकरच सुरू होणार असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल अशी माहिती यावेळी देण्यात आली. पारदर्शक वजन मापन व्यवस्था तसेच वेळेत बिले अदा करण्याची व्यवस्था असल्याने शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस कारखान्याकडे पाठवावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी व्यवस्थापक संचालक सदानंद पाटील बोलताना म्हणाले, मागील वर्षी कारखान्यात कटिंग खर्च म्हणून ३२५ रुपये देण्यात आले असून प्रत्येक शेतकऱ्याच्या लागवड क्षेत्राची तपासणी करून गावनिहाय आराखडा तयार करून योग्य वेळी ऊस तोडणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक सुबराव पाटील, महादेव बांदिवडेकर, साखर अधिकारी बाळासाहेब शेलार, राजू सिद्दानी, भरमाणी पाटील आदी उपस्थित होते.

Tags: