मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांचे आणि घरांच्या नुकसानीचे योग्य सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशा सक्त सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

व्हॉइस : अतिवृष्टी आणि पूरप्रतिबंधक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसात ८७७ हेक्टर प्रदेश पाण्याखाली आला आहे. या जमिनीचे सर्वेक्षण करून योग्य मोबदला देण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. आतापर्यंत एकूण ७७५ घरांना मार्गसूचीनुसार तातडीने भरपाई देण्यात यावी, असेही पालकमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील नद्या आणि उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, असे जिल्हा पालकमंत्री म्हणाले. गेल्या तीन वर्षात ७५०२३ नुकसानग्रस्त घरांना ९२४ कोटी रुपये भरपाई देण्यात आली आहे.

जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ पुढे म्हणाले, एनडीआरएफ आणि स्थानिक पथकांनी एकमेकांच्या सहकार्याने गावात जागृती शिबीर आयोजित करून पूर परिस्थितीसंदर्भात जनजागृती करावी. नागरिक तसेच जनावरांचे संरक्षण कशा पद्धतीने करावे, यासंदर्भात माहिती देण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वाचविण्यासाठी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
या बैठकीला चिकोडी सदलगा आमदार गणेश हुक्केरी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही, पोलीस वरिष्ठाधिकारी डॉ. संजीव पाटील यासह कृषी, बागायत, महसूल विभागासह विविध विभागातील जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments