ती काही साधीसुधी घोडी नव्हे. खरोखरच सुपर पॉवर घोडी म्हणायला हवी. भाग घेतलेल्या 25 शर्यतींपैकी तब्बल 23 शर्यती जिंकण्याचा मान तिच्या नावावर आहे. ज्या शर्यतीत जाईल तिथे तिचा पहिला नंबर ठरलेलाच ! अशा घोडीच्या अचानक जाण्याने कोणाच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत सांगा बरं? याबाबत पेश आहे एक खास रिपोर्ट !

होय, बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरातील मातंगीकेरी गल्लीतील अनिल माळी यांनी पाळलेल्या अडीच वर्षे वयाच्या घोडीचे अचानक निधन झाले. माणूस मेल्यावर जसे विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात, तशाच पद्धतीने छबी नामक या घोडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
होय, पाहताच प्रेमात पडाल अशा मजबूत शरीरयष्टीच्या छबीचा गोतावळाही खूप मोठा. त्यामुळेच छबीच्या निधनाचे वृत्त कळताच मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, छबीचे अंत्यदर्शन घेऊन तिला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. छबीच्या अचानक जाण्याचे दुःख तिच्या चाहत्यांना कसे, किती झालेय पहा.
छबीच्या जाण्याने आमच्या घरचीच मुलगी गेल्याचे दुःख आम्हाला झाले आहे. माणूस जसा दुसऱ्या माणसावर प्रेम करतो अगदी तसेच प्रेम चिक्कोडीवासीयांनी छबीवर केले. आता छबी आमच्यात नसल्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे असे छबीचे चाहते महेश कांबळे यांनी सांगितले.
1 जुलैला छबीचे निधन झाले होते. छबीच्या समाधीजवळ जमून लोकांनी पाणी ठेवण्याचा कार्यक्रम केला. त्यावेळी छबीच्या समाधीवर फुलांची सजावट करण्यात आली. छबीच फोटो समाधीवर ठेवून पूजा करण्यात आली. छबीच्या समाधीस्थळावर जमून मातंगीकेरी, संजय गांधीनगरसह विविध वसाहतीतील युवकांनी छबीला श्रद्धांजली वाहिली. छबी पुन्हा जन्माला ये, तुझी जागा दुसरा कोणताच घोडा घेऊ शकत नाही असे सांगताना छबीचे मालक अनिल माळी यांचे डोळे भरून आले होते.
छबी केवळ एक घोडी नव्हती, कर्नाटक-महाराष्ट्रासह कुठेही घोडागाडीच्या शर्यती असल्या की छबीच चमत्कार ठरलेला असायचा. शर्यतीच्या रांगेत ती थांबली की, दुसरे घोडे, घोडामालकांना धडकी भरायची. “छबीदार छबी, मी तोऱ्यात उभी’ या गाण्याप्रमाणेच तिचा तोरा असायचा. अन्य घोडेमालकांनाही छबीचे आकर्षण होते. अशी छबी आता हयात नाही यावर विश्वास बसत नाही. मिस यु छबी, पुन्हा जन्माला ये छबी !


Recent Comments