आषाढी एकादशीसाठी विठुरायाच्या दर्शनाच्या आशेने पायी वारी करत पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांचे आज पहाटे हुक्केरी शहरात हृद्य स्वागत करण्यात आले.

होय, आषाढवारी जवळ आल्याने गावोगावच्या विठ्ठल भक्तांत वेगळाच उत्साह संचारला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांनी पायी दिंड्या काढत पंढरीची वाट धरली आहे. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर-धामणे गावच्या वारकऱ्यांनीही नुकताच पायी दिंडीला प्रारंभ केला आहे. आज शुक्रवारी पहाटे या दिंडीचे हुक्केरी शहरात आगमन झाले. त्यावेळी हुक्केरीवासियांनी आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत केले. ऍड. काडप्पा कुरबेट, चंद्रशेखर संसुद्धी, विवेक पुराणिक, राजू नाईक यांनी दिंडीचे मनःपूर्वक स्वागत करून वारकऱ्यांचा आशीर्वाद घेतला.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिंडी प्रमुख मारुती सांबरेकर म्हणाले, दरवर्षी बेळगावजवळील धामणे गावातून शेकडो माळकरी, वारकरी पायी दिंडी काढून आषाढीला पंढरीत विठुरायाचे दर्शन घेतात. गेली २ वर्षे कोरोनामुळे पायी दिंडीवर बंदी होती. आता कोरोना संकट टाळल्याने यंदा दिंडीला अनुमती दिली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. आम्ही सगळे वारकरी पायी दिंडीने १० जुलै रोजी पंढरपूरला पोहोचून विठ्ठलाचे दर्शन घेणार आहोत असे त्यांनी सांगितले.
यावेळी टाळ-चिपळ्या, वीणा, मृदंगाच्या तालावर विठ्ठलाची भजने, अभंग गात शेकडो वारकरी भक्तिरसात चिंब झाले होते.


Recent Comments