Hukkeri

हुक्केरीत दुकानदाराची दिशाभूल करून २० तोळे सोन्याचे दागिने लांबवले

Share

हुक्केरी शहरात चोरीच्या घटना वाढत असतानाच सराफी दुकानात दिशाभूल करून एका भामट्याने २० तोळे सोन्याचे दागिने असलेला डबा लांबविल्याची घटना शहरात घडली आहे.

हुक्केरी शहरात गेल्या ६ महिन्यांत अनेक वसाहतीत अनेक घरफोड्या तसेच भरदिवसा किराणा दुकानातून ५ लाख रुपये लांबविणे अशा घटना घडल्या आहेत. त्यात आता दुकानमालकाची दिशाभूल करून २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबविल्याच्या घटनेची भर पडली आहे. दोनच दिवसांपूर्वी विद्या ज्वेलर्स या सराफी दुकानात शिरलेल्या एका भामट्याने दुकानमालकाला, ‘तुझ्या भावाने जो डबा ठेवला आहे तो मला दे’ असे सांगत दिशाभूल करून २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असलेला डबा हातोहात लांबवला. या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे.

सायंकाळी सोन्याच्या दागिन्यांचा मेळ घालताना ही बाब दुकानदाराच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने हुक्केरी पोलीस स्थानकात धाव घेऊन याबाबत फिर्याद देऊन सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले. याबाबत दुकानदाराने ‘आपली मराठी’ला माहिती दिली.

दरम्यान, अलीकडच्या काळात हुक्केरी, संकेश्वर आणि यमकनमर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढल्याने गोकाक उपविभागाचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांनी या स्थानकाच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करून कडक उपाय योजण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकंदर हुक्केरी परिसरात फसवणूक आणि चोरीच्या घटना वाढल्याने जनता भयभीत झाली आहे. चोरांच्या मुसक्या आवळून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

 

 

Tags: