Chikkodi

स्वच्छ आणि सुंदर परिसराच्या संकल्पनेतून २२ वर्षे ‘हि’ शाळा आहे कार्यरत

Share

रस्त्यावरून जाताना आपल्याला अतिशय हिरवळ दिसली, झाडे दिसली कि आपण त्याठिकाणी नक्कीच शाळा असल्याचे गृहीत धरतो. निसर्ग संरक्षणासाठी अनेक झाडे शाळा परिसरात लावली जातात. परंतु चिकोडी येथे एका शाळेत संपूर्णपणे हिरवळच दिसून येते. हि शाळा आणि या शाळेचा परिसर हा एक अनोख्या पद्धतीने सजविण्यात आला आहे. निसर्गरम्य वातावरणात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या शाळेतील अनुभव एक वेगळाच जाणवत असेल हे नक्की! पाहुयात या शाळेसंदर्भातील आपली मराठीचा हा विशेष रिपोर्ट!

बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील कुप्पनवाडी या गावात ११ एकर विशाल परिसरात विश्व शिक्षण संस्थेची श्री मुरूघेंद्र शाळा वसली आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे २०० हुन धिक विद्यार्थी कन्नड आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत आहेत. शिक्षणप्रेमी डॉ. के. पी धरीगौडर यांनी स्थापन केलेल्या या शाळेत दररोज पर्यावरण दिवस साजरा केला जातो! सध्या शहरांचे काँक्रीटीकरण होत असल्याने अनेकांची पाऊले पुन्हा ग्रामीण भागाकडे वळत आहेत. यामुळे आपला परिसर निसर्गरम्य वाटावा, निसर्गाच्या कुशीत, मोकळ्या आणि स्वच्छ हवेत जगता यावे, शिकता यावे या उद्देशातून या शाळेचा एक अनोखा कन्सेप्ट सध्या चर्चेत आहे.. तब्बल २२ वर्षांपासून हि शाळा निसर्गसंरक्षणातून शिक्षणाचे धडे देत आहे. ११ एकर परिसरात ४० ते ५० विविध प्रजातींची सुमारे १ हजारहून अधिक झाडे आहेत. विविध फळाफुलांच्या झाडांच्या सानिध्यात येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

२० वर्षांपूर्वी माळरान असेल्या जमिनीचे सध्या नंदनवन झाले आहे. या शाळेचा परिसर स्वप्नवत वाटावा इतका सुरेख आहे. याच परिसरात सिद्धेश्वर वन देखील आहे. २४ तीर्थांकरांच्या स्मरणार्थ याठिकाणी २४ प्रकारच्या फळबागा आहेत. या परिसरात बहुतांशी झाडे हि फळांची आहेत. या शाळेतील हे वातावरण पाहून अनेक पालकांकडून आपल्या पाल्याला याच शाळेत प्रवेश मिळावा, अशी इच्छा व्यक्त होते. स्वच्छ आणि सुंदर परिसर, स्वच्छ हवा यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सहजसोपे जाते, यामुळे पालकांचा कल या शाळेकडे मोठ्या प्रमाणात आहे. या शाळेत प्रयोगशाळा, डिजिटल क्लास रुमसह अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. गुरुकुलाप्रमाणे सुरु असलेल्या या शाळेत वर्षातील ३६५ दिवस पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो, याचे कुतूहल विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात आहे.

सध्या डिजिटलायझेशनच्या जमान्यात अनेक गोष्टी निसर्गाच्या विरोधात उभ्या होत आहेत. निसर्गाला हानी पोहोचवून अनेक गोष्टी करण्यात येत आहेत. मात्र चिकोडी येथील श्री मुरूघेंद्र शाळा हि याला अपवाद आहे. केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण देण्याऐवजी नीतिपाठ देखील या शाळेच्या माध्यमातून देण्यात आल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांचाही कल या शाळेकडे अधिक आहे.

Tags: