हुक्केरी तालुक्यात काही ठिकाणी, काही प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. मात्र मातीतील ओलाव्याचे प्रमाण वाढल्यावरच पेरणी हंगामाला सुरुवात करावी, अशी सूचना हुक्केरीचे कृषी संचालक महादेव पटगुंदी यांनी केली आहे.

शुक्रवारी शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर, यमकनमर्डी, हुक्केरी आदी भागातील शेतकरी संपर्क केंद्रात तसेच तालुक्यात ३५ वितरण केंद्रात खरीप हंगामातील पिकांच्या बियाणांचे, प्रामुख्याने सोयाबीन बियाणांचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक आणि खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांसंदर्भात तसेच मातीच्या ओलाव्यासंदर्भात माहिती देण्यात आली. या साऱ्याची माहिती शेतकऱ्यांनी घेऊन शेतीकाम हाती घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचप्रमाणे खाजगी खतांच्या वितरणासंदर्भात देखील माहिती आणि सूचना देण्यात आली. खतांच्या योग्य वापर, आणि प्रमाण यासंदर्भात देखील यावेळी माहिती देत कोणत्याही खताच्या आणि बियाणांच्या खरेदीपूर्वी अधिकृत माहिती घेण्याची सूचना देण्यात आली.

यावेळी हुक्केरी, यमकनमर्डी कृषी अधिकारी एस एम कामत, संकेश्वर कृषी अधिकारी राघवेंद्र तळवार, तांत्रिक सहायक नरेंद्र नडोनी आदी उपस्थित होते.


Recent Comments