कर्नाटकात गाजत असलेल्या पीएसआय भरती घोटाळ्यातील किंगपिन दिव्या हागरगीला सीआयडी पथकाने अखेर महाराष्ट्रातील पुणे येथून अटक केली आहे.
होय, राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या पीएसआय भरती घोटाळ्यातील मोस्ट वाँटेड आणि गेल्या १८ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेली किंगपिन दिव्या हागरगी हिला अखेर सीआयडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीआयडीच्या विशेष पथकाने महाराष्ट्रातील पुणे येथे दिव्याला काल रात्री उशिरा अटक केली.
तिला पुण्याहून कलबुर्गीला आणण्यात येत आहे. आरोपी दिव्या हागरगी भारतीय जनता पक्षाची नेता असून तिचा राजकीय क्षेत्रात दबदबा असल्याचे सांगितले जात आहे. कलबुर्गी येथे ती ‘ज्ञान ज्योती’ नावाची शाळा चालवते. हीच शाळा पीएसआय भरती परीक्षेचे केंद्रही होती. अनेक उमेदवारांनी याच शाळेला परीक्षा केंद्र म्हणून पसंती दर्शविल्याने शंकेची पाल चुकचुकली होती.
याच शाळेत परीक्षेचा कालावधी संपल्यानंतरही ओएमआर शीटवर रिकाम्या सोडलेल्या जागेत उत्तरे लिहू दिल्याचा आरोपही दिव्या हागरगीवर आहे. अटकेनंतर आता तिच्या चौकशीनंतर या प्रकरणातील आणखी महत्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, पीएसआय भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी दिव्या हागरगी, अर्चना, सद्दाम, सुरेश, सुनंदा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना कर्नाटकात आणण्यात येत आहे. आणल्यावर त्यांची चौकशी करण्यात येईल. एकाहून अधिक केंद्रांवर गडबड झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारने पीएसआय भरती परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.
Recent Comments