हुक्केरी शहरात येत्या रविवारी २४ एप्रिल रोजी स्वयंप्रेरित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संत निरंकारी सत्संग मंडळातर्फे हुक्केरीतील संत निरंकारी सत्संग भवनात येत्या रविवारी रक्तदान शिबीर आयोजित केल्याची माहिती मंडळाचे संतमुखी मारुती मोरे यांनी ‘आपली मराठी’ला दिली. मानव एकटा दिनानिमित्त निरंकारी मंडळाच्या दिल्ली येथील मुख्यालयातर्फे देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेव महाराज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या शिबिरांचे उदघाटन करणार आहेत. हुक्केरी येथील शिबिर क्षेत्रीय संचालक मनोहर झा यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, त्यात हुक्केरी, रायबाग, बावन सौंदत्ती, मोरब, कंचगरवाडी, निलजी, दड्डी आदी भागातील भक्त सहभागी होणार आहेत. शिबिरात रक्तदान करून इतरांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 
यावेळी संत बी. आर. जाधव म्हणाले, माणसाने नेहमीच रक्तदान करून गरजूंची प्राण वाचविले पाहिजेत. रविवारी २४ एप्रिलला सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराला प्रारंभ होणार आहे. स्थानिक डॉक्टर संघटना, रेड क्रॉस आणि केएलई इस्पितळाच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात येणार आहे. तहसीलदार डॉ. डी. एच हुगार शिबिराचे उदघाटन करणार आहेत. नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बाबा निरंकारी मंडळाचे सदस्य राजू कोष्टी, सिद्धू बेनाडीकर, केम्पण्णा आंबले, निंगाप्पा पायन्नावर, युवराज जाधव, संदीप सूर्यवंशी, रवी कदम, गजानन भोवी, अशोक कलाज उपस्थित होते.


Recent Comments