चिकोडी शहरात तालुका सरकारी रुग्णालयात बुधवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्याधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे यांनी दिली.

बुधवार दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता तालुकास्तरीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिकोडी टीएचओ कार्यालयात पत्रकारांशी बोलताना डॉ. विठ्ठल शिंदे यांनी हि माहिती दिली असून जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, जिल्हा आयुष विभाग, बेळगाव, अपर जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग चिकोडी, आणि तालुका प्रशासन, तालुका पंचायत, नगरपालिका महसूल विभाग चिकोडी, तालुका आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग चिकोडी, महिला आणि बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, आयएमए चिकोडी तसेच विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिराचे उद्घाटन खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गणेश हुक्केरी, प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री शशिकला जोल्ले आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे.
या शिबिरात सांसर्गिक, जुनाट आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, चाचणी आणि मोफत उपचार केले जाणार आहेत. हेल्थकेअर तज्ञांमध्ये हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, हाडे आणि सांधे तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, कर्करोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, सर्जन, कान, नाक आणि घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, दंतवैद्य, भारतीय आयुर्वेदिक सेवा तज्ज्ञांच्या वतीने मोफत प्रयोगशाळा चाचणी, मोफत औषध वितरण, क्षयरोग तपासणी
योग आणि ध्यान, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग तपासणी, नेत्रचिकित्सा नोंदणी आदी सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत.
यावेळी आयुष्यमान आरोग्य कर्नाटक कार्डचे वितरण तसेच इ संजीवनी मार्फत तज्ज्ञ वैद्यांशी संपर्क साधून उपचार देण्यात येणार आहेत. शिबिरात दाखल होणाऱ्या नागरिकांनी यापूर्वी घेतलेल्या डॉक्टरांचे डिस्क्रिप्शन, प्रिस्क्रिप्शन, आधार कार्ड आणि रेशनकार्ड (बीपीएल, एपीएल) आणि त्यांचा मोबाईल क्रमांक सोबत येताना आणावयाचा आहे. या आरोग्य शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन डॉ. विठ्ठल शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, प्राथमिक संरक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सरकारी रुग्णालयाचे मुख्य वैद्याधिकारी संतोष कोण्णूरे उपस्थित होते.


Recent Comments