Chikkodi

युवतीला चिडवू नको म्हणून समज दिल्याने एकाची हत्या

Share

युवतीला चिडवून त्रास देऊ नकोस असे सांगण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसान तरुणाच्या खुनात झाले. ही घटना चिक्कोडी तालुक्यातील शिरगाव गावात घडली.

होय, ४२ वर्षीय संतोष आप्पासाहेब तेली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिरगाव गावातील एका तरुणीला गेल्या अनेक दिवसांपासून भीमप्पा महादेव मगदुम चिडवून त्रास देत होता. तरुणीच्या पालकांनी गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत भीमप्पा मगदुम याला समज दिली होती. यामध्ये संतोष आप्पासाहेब तेली    यांनीही भीमप्पाला तु असे करणे योग्य नाही, अशी समज दिली होती. त्यावरून भीमप्पा आणि संतोष यांच्या किरकोळ भांडणही झाले होते. त्यानंतर भीमप्पा ३ महिने गाव सोडून गेला होता. काही दिवसांपूर्वी तो परत गावात आला. त्यानंतर त्याने संतोषसोबत मैत्री केली. बुधवारी रात्री ८च्या सुमारास हे दोघेही शिरगावमधील बेळगाव वाईन्स या दुकानात गेले होते. त्यानंतर तेथे हा विषय पुन्हा आला व त्यातून झालेल्या वादात भीमप्पाने आपल्याकडील धारदार चाकूने संतोषला भोसकले. त्यामुळे अधिक रक्तस्त्राव होऊन संतोष जागीच मरण पावला. खून केल्यानंतर भीमप्पा फरारी झाला आहे. घटनास्थळी खडकलाट पोलीस ठाण्याचे पीएसआय लक्ष्मण आरी यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहावर चिक्कोडी सरकारी इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या खुनामुळे शिरगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

Tags: