आर्थिक व्यवहारातून बेळगाव तालुक्यातील रणकुंडये येथे युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अन्य फरारी आरोपींचा शोध सुरु आहे.
होय, शनिवारी मध्यरात्री रणकुंडये येथील ३१ वर्षीय युवक नागेश भाऊसाहेब पाटील याचा घरात घुसून बेदम मारहाण करून नंतर तीक्ष्ण हत्यारांनी भोसकून खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींची नागेशचा मृतदेह घरासमोर टाकून पळ काढला होता. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा पोलिसांचा कयास खरा ठरला आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करून चौघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपी खून झालेल्या नागेशचे मित्रच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद सहदेव पाटील (वय ३२), त्याच्या भाऊ श्रीधर सहदेव पाटील (वय २८), महेंद्र यल्लाप्पा कंग्राळकर (वय २१) आणि भोमानी कृष्णा डुकरे यांना बेड्या ठोकल्या आहेत. हत्या झालेल्या नागेशच्या वडिलांनी आरोपी प्रमोद पाटील याला ४ वर्षांपूर्वी २० हजार रुपये उसने दिले होते. ते त्याने परत दिले नव्हते. त्यामुळे नागेशने पैसे परत देण्यासाठी प्रमोदकडे तगादा लावला होता. या कारणावरून या दोघांमध्ये २ आठवड्यांपूर्वी भांडणही झाले होते. पैसे परत मागितल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी प्रमोदने नागेशला दिली होती. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री प्रमोदने भाऊ श्रीधर, मित्र महेंद्र आणि भोमानी यांच्यासमवेत नागेशला त्याच्या घरातून उचलून कारमधून नेऊन मारहाण केली तसेच कारमध्ये त्याचा खून करून नंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरासमोर टाकून फरारी झाले. या घटनाक्रमाची सविस्तर माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
एकंदर पित्याने दिलेले कर्ज मुलाच्या जीवावर उठल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. खुनाच्या २-३ दिवसांतच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे उकरून काढून आरोपीना बेड्या ठोकल्या ही कौतुकाची बाब आहे.
Recent Comments