गर्भवतीच्या मृत्यूनंतर तातडीने शस्त्रक्रिया करून जुळ्या मुलींचा जीव वाचविण्यात खानापूर सरकारी इस्पितळाच्या डॉक्टर्सना यश आले. दुर्दैवाने मातेचा मृत्यू झाला असला तरी दोन कोवळ्या जीवांना डॉक्टररुपी देवदूतांनी जीवदान दिले.

खानापूर तालुक्यातील गंगवाळी गावची रहिवाशी महिला उज्ज्वला अरुण शिंदे वय 24, असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तिला असह्य प्रसूतिवेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला खानापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता पोटात बाळ आडवे असल्याचे समजून आले. याच दरम्यान, उज्ज्वलचा रक्तदाब कमी-जास्त होऊ लागला. तिची ऑक्सिजनची पातळीही कमी झाली. त्यामुळे प्रसूती करणे अवघड बनले. डॉक्टर व परिचारिकांनी तिच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन याविषयी माहिती दिली. त्यांच्या तयारीनंतर लागलीच प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यामुळे त्या दोन कोवळ्या मुलींचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने तोवर अतिरक्तस्राव झाल्याने आणि हृदयविकाराच्या झटक्याने उज्ज्वलाचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी कमी वाढीच्या या २ अर्भकांना अधिक उपचारांसाठी अंबुलचेने बेळगाव जिल्हा इस्पितळात पाठवून दिले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र बाळंतिणीच्या मृत्यूने कुटुंबियांवर शोककळा पसरली. इस्पितळ आवारात कुटुंबीयांनी एकच गर्दी केली होती. खानापूर पोलिसांनी इस्पितळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.


Recent Comments