Khanapur

सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनईकर यांच्यावर प्राणघातक हल्ला

Share

 खानापूरचे सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनईकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. ही खळबळजनक घटना बेळगावखानापूर रस्त्यावरील झाडशहापूरजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.

होय, बेळगाव-खानापूर रस्त्यावरील झाडशहापूरजवळ शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास दुचाकींवरून आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने जयंत तिनईकर यांच्यावर रॉडने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. तिनईकर यांची कार अडवून हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. खानापुरात सुरु असलेल्या काही अतिक्रमणांविरोधात तिनईकर यांनी आवाज उठवत तक्रार दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने खळबळ माजली आहे. तिनईकर हे आपल्या वॅगन आर कारमधून शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास बेळगावहून खानापूरला परतत होते. झाडशहापूरजवळ सर्व्हिस रस्त्यावरून ते मुख्य रस्त्याला आले.

त्यावेळी 3-4 दुचाकीवरून त्यांच्या कारचा पाठलाग करत आलेल्या सुमारे 7-8 जणांच्या टोळक्याने दुचाकी त्यांच्या कारच्या समोर आडव्या लावून तिनईकर यांना कारमधून बाहेर येण्यास भाग पाडले. ते कारबाहेर येताच हल्लेखोरांनी रॉडने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. या अज्ञात हल्लेखोरांनी तोंडाला स्कार्फ बांधला होता. हल्ला केल्यानंतर ते दुचाकींवरून फरार झाले. हल्ल्यात तिनईकर यांच्या उजव्या गुडघ्याला तसेच उजव्या खांद्याजवळ जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खानापूर सरकारी इस्पितळात प्रथमोपचार करून अधिक उपचारांसाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

 

 

 

Tags: