Kagawad

कागवाडमधील पाटबंधारे विभाग कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन

Share

कागवाड तालुक्यातील पाटबंधारे योजनेला शेकडो स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला.

ही योजना कृष्णा नदीतून कागवाड तालुक्यातील २१ हजार हेक्टर प्रदेशासाठी पाणीपुरवठा करते. गेल्या १२ वर्षांपासून ही योजना कार्यान्वित असून ऐनापूरमधील पाटबंधारे योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कालव्यातील २७ किलोमीटर लांबीच्या या कालव्यातील पहिल्या पाच किलोमीटर लांबीच्या कालव्यातून पाणीगळती झाल्याने सुमारे ५ हजार एकर कालव्यातील शेजारची जमीन ओलिताखाली अली आहे. यामुळे गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून या जमिनीसह पिकांचेही नुकसान झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामकाजाचा हा परिणाम असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली.

यासंदर्भात बोलताना एका शेतकऱ्याने सांगितले कि, सदर पाटबंधारे योजनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पुढील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आखण्यात आलेल्या या योजनेमुळे या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे तसेच पिकांचेही नुकसान झाले आहे. आपल्याला मागील १० वर्षांपासूनच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते के रवी यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारून सदर मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडण्याचे आश्वासन दिले. अथणीचे सुपिरिटेंडंट इंजिनियर बी आर राठोड, कार्यकारी अभियंते के के जालिबेरी हे उद्या ऐनापूरला भेट देणार असून पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले.

या आंदोलनात प्रवीण गाणीगेर, अरुण गाणीगेर, राजेंद्र पोतदार, संजू बिरडी, सुरेश गाणीगेर, आदिनाथ दानळ्ळी आदींसह इतर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Tags: