Ramdurg

रविवारी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची जिल्ह्यात हजेरी : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ बेळगाव दौरा

Share

बेळगाव विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारासाठी आज निवडणूक रणधुमाळी आखाड्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस राज्याध्यक्ष डी के शिवकुमार उतरले. यावेळी चन्नराज हट्टीहोळी यांच्यासाठी उभयतांनी मतयाचना केली.

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील कल्लुरी येथे रामदुर्गचे माजी आमदार अशोक पट्टण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासाठी मतयाचना करण्यात आली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस राज्याध्यक्ष डी के शिवकुमार यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

यावेळी माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. भाजप सरकार जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणूक घेण्यास घाबरत असून निवडणूक पुढे ढकलत आहे, असा आरोप करत भाजपच्या अंतर्गत राजकारणावरदेखील त्यांनी टीका केली. येडियुरप्पा यांना पायउतार करण्यासाठी बोम्मई यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. २ वर्षे ४ महिने सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने कोणती कामे केली आहेत हे सांगा.. असा सवाल सिध्दरामय्यांनी उपस्थित केला.

या कार्यक्रमावेळी बोलताना केपीसीसी राज्याध्यक्ष डी के शिवकुमार म्हणाले, काँग्रेसमधून चन्नराज हट्टीहोळी निवडणूक लढवीत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकरांचे बंधू म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली नसून तरुण, अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या चन्नराज हट्टीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चन्नराज हट्टीहोळी आपल्या विकासासाठीच काम करतील. विधान परिषदेत आपल्या समस्यांसंदर्भात आवाज उठवतील. त्यांच्यातील हि क्षमता पाहून त्यांना उमेदवारी देण्यात आली असून रामदुर्गमध्ये काँग्रेस विजयी होणे गरजेचे आहे, आपले स्वाभिमानाचे मत काँग्रेसलाच द्यावे, असे आवाहन डी के शिवकुमार यांनी केले.

यावेळी रामदुर्गचे माजी आमदार अशोक पट्टण, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, निवडणूक निरीक्षक ह्यारीस आदींसह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: