Chikkodi

येडूर वीरभद्र देवस्थानात दीपोत्सव

Share

कार्तिक अमावास्येच्या निमित्ताने शनिवारी येडूर येथील वीरभद्र देवस्थान आणि काडसिद्धेश्वर मठात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दीपोत्सवात अनेक भक्तांनी सहभाग घेत मंदिर परिसर दिव्यांनी प्रकाशमय केला होता.

चिकोडी तालुक्यातील येडूर येथील वीरभद्र देवस्थान आणि काडसिद्धेश्वर मठात कार्तिक मासाच्या शेवटच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अत्यंत श्रद्धा आणि भक्तिपूर्ण वातावरणात भक्तांनी या दीपोत्सवात सहभाग घेत विविध धार्मिक विधीही पार पाडल्या. विविध प्रकारचे दिवे प्रज्वलित करून श्रीशैल जगद्गुरू यांच्या साक्षीने दीपोत्सव पार पडला.

वीरभद्र देवस्थान आणि काडसिद्धेश्वर मठात आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवात कर्नाटकासह महाराष्ट्रातील भाविकांनीही उपस्थिती लावली होती. संपूर्ण कुटुंबासमवेत आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत संपूर्ण देवस्थान परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता.

या कार्यक्रमाची सुरुवात श्रीशैल जगद्गुरू यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्रीशैल शास्त्री आणि वैदिक पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी धार्मिक विधींसोबत आकर्षक रोषणाईने सजलेला मंदिर परिसर लक्ष वेधून घेत होता. या दीपोत्सवात स्वस्तिक, ओंकार आणि शिवलिंगाच्या आकारात सजविण्यात आलेल्या दिव्यांची रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी श्रीशैल शास्त्री बोलताना म्हणाले कि, अलंकारिक दिव्यांप्रमाणे ज्ञानाच्या दिव्याचा प्रकाश सुद्धा आज तितकाच महत्वाचा आहे. या दिव्यांप्रमाणेच ज्ञानज्योतीच्या माध्यमातून समाजात प्रबोधन घडावे, या उद्देशाने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.  या दीपोत्सवात वीरभद्र देवस्थान आणि काडसिद्धेश्वर मठाचे अनेक भाविक उपस्थित होते.

Tags: