निवडणूक संपल्यानंतर आम्ही ‘नॉट रिचेबल’ होत नाही. दिवसातील २४ तास जनतेच्या कामांसाठी तत्पर असतो. जनतेचे कष्ट आम्ही जाणतो. त्यामुळे नॉट रिचेबल होणाऱ्या उमेदवारांना नाकारून काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा, असे आवाहन ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारासाठी शनिवारी कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी आणि उगार परिसरातील ग्राम पंचायत सदस्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आम. लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. बंगळूरमध्ये अधिकारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गावांचा विकास होत नाही. अशाचपद्धतीने जनतेचाही विकास होत नाही. आम्ही जनतेमध्ये राहून काम करतो. तुमच्या समस्यांसंदर्भात विधानसौधमध्ये आवाज उठवतो, यासाठी चन्नराज हट्टीहोळी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
यानंतर माजी खासदार प्रकाश हुक्केरी बोलताना म्हणाले, राज्यात देशात पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चाली आहे. भाजपने जनतेचा भ्रमनिराश केला असून राज्यात २०२३ साली होणाऱ्या निवडणुकीत कांग्रेस पक्ष सत्तेवर नक्की येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर माजी आमदार राजू कागे बोलताना म्हणाले, गेल्या एक आठवड्यापासून कागवाड मतदार संघात निवडणुकीच्या निमित्ताने फिरत आहे. काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी याना वाढता पाठिंबा मिळत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कागे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री ए. बी. पाटील, माजी आमदार मोहनराव शहा, शहाजहान डोंगरवाड, केपीसीसी सदस्य दिग्विजय पवार देसाई, चंद्रकांत इम्मडी, ब्लॉक अध्यक्ष विजयकुमार अकिवाटे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments