अपक्ष उमेदवार आणि रमेश जारकीहोळींचे बंधू लखन जारकीहोळी आणि भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्यासाठी आज रमेश जारकीहोळींनी निपाणी येथे जोरदार प्रचार केला.

निपाणी तालुक्यातील स्तवनिधी गावात अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना रमेश जारकीहोळींनी भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ आणि लखन जारकीहोळी यांच्या विजयासाठी मतयाचना केली. उभयतांना विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन रमेश जारकीहोळींनी केले. 
रमेश जारकीहोळी पुढे बोलताना म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसला पराभूत करण्याच्या उद्देशाने माझे बंधू लखन निवडणुकीत उभारले आहेत. हेब्बाळकरांच्या बंधूंना जर काँग्रेसने उमेदवारी दिली नसती, प्रकाश हुक्केरी किंवा विवेकराव पाटील यांना उमेदवारी दिली असती तर लखन जारकीहोळींना निवडणूक लढविण्याची गरज लागली नसती. युतीचे सरकार पडल्यानंतर डीकेशींविरोधात माझे बंधू बंडखोरीने हि निवडणूक लढवीत असल्याचे रमेश जारकीहोळींनी सांगितले.
प्रचार सभेदरम्यान व्यासपीठावरून लखन जारकीहोळींच्या बाजूने बॅटिंग करणाऱ्या रमेश जारकीहोळींनी अप्रत्यक्षपणे भाजपाच्यावतीने पाठिंबा दर्शविल्याचे जाणवत आहे. भाजपचे महांतेश कवटगीमठ यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून डीकेशींविरोधात बंडाचे राजकारण करण्यासाठी लखन जारकीहोळी निवडणूक रिंगणात उतरल्याचे रमेश जारकीहोळींनी स्पष्ट केले आहे. अशातच पुन्हा एकदा लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव घेऊन नव्या वादालाही सुरुवात करण्यात आली असून विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापर्यंत आणखी किती हेवेदावे ऐकायला मिळतील, आणि कुणाचे पारडे जड होईल, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.


Recent Comments