कृष्ण नदीतीरावर गौरी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हजारो भक्तांच्या उपस्थितीत रायबाग तालुक्यातील जुन्या दिग्गेवाडी गावातील शक्तिदेवी म्हणून परिचित असलेल्या गंगादेवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या या यात्रोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सुमारे २०० वर्षांपासून जागृत असलेल्या दैवीपुरुष लगमाण्णा अज्जनावर यांच्या काळापासून या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जात, धर्म, पंथ, भेद असा कोणताही भेद भाव न बाळगता गेल्या अनेक दशकांपासून येथील स्थानिक देवऋषी महादेव गंगाई यांच्या नेतृत्वाखाली श्री गंगादेवीची विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात येतो.
चिकोडी तालुक्यातील उमराणी येथील ग्रामदेवता श्री भावेश्वरी देवी हि श्री गंगादेवीची बहीण असल्याचे मानले जाते. उमराणी गावातील हजारो भक्त श्री गंगादेवीच्या दर्शनासाठी येतात. तसेच येथील प्रथेनुसार नैवेद्य देखील अर्पण करतात. ओटी भारतात. येथील कृष्ण नदीला नैवेद्य अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात, असे या यात्रेचे स्वरूप असल्याचे येथील शिक्षक सिद्दू चौगुले यांनी सांगितले.
या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही दूरवर असलेल्या जुन्या आणि नव्या दिग्गेवाडीतील सासुरवाशीण या यात्रेसाठी आवर्जून येतात. तसेच या यात्रेत महानैवेद्याच्या परंपरेत सहभाग घेतात, अशी माहिती चिदानंद चौगुले यांनी दिली.
या यात्रोत्सवाची सुरुवात येथील पारंपरिक वाद्यवृंदांच्या माध्यमातून करण्यात आली. श्री गंगादेवीचा पालखी उत्सव, मिरवणूक, महानैवेद्य असे या यात्रेचे स्वरूप आहे. गदग जिल्ह्यातील कोण्णूर येथील महिला पथकाने पारंपरिक लोककलेचे सादरीकरण केले. त्या नंतर बिरेश्वर नाट्य संघाच्या वतीने नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.


Recent Comments