शिवचरित्र आणि ‘जनता राजा’ महानाट्याचे माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य जगभरात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवशाहीर पुरंदरे घरात पाय घसरून पडल्याने त्यांना इजा झाली होती. तशातच त्यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे समजते. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असे त्यांचे पुत्र अमृत पुरंदरे यांनी सांगितले. बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलैला शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. प्रत्येक मराठी घरा-घरात शिवचरित्र पोहोचविण्याचे महान कार्य पुरंदरे यांनी केले. २०१५ पर्यंत त्यांनी शिवचरित्रावर १२ हजारहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ तर भारत सरकारने ‘पद्म विभूषण’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.


Recent Comments