Kagawad

कागवाड तालुक्यात शेतकऱ्यांनी सुरु केली कृषी संस्था

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूर परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांनी अन्नदाता ऍग्रो संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्घाटन कृषी तज्ज्ञ शिवानंद कुंभार आणि प्रगतशील शेतकरी प्रमोद मुतालिक यांच्याहस्ते पार पडले.

ऐनापूर परिसरात सुमारे २५ हजार एकर परिसरात शेतजमीन वसलेली आहे. कृष्ण नदीतीरावरील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता नाही. शेतकऱ्यांना विशिष्ट वेळेत विशिष्ट खते आणि पाणी पुरविण्याची आवश्यकता असून याठिकाणी कृषी तज्ज्ञांची कमतरता आहे. हि अडचण लक्षात घेऊन अन्नदाता ऍग्रो संस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची भरती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे अन्नदाता ऍग्रोचे संचालक प्रमोद आस्की, अनिल पत्तर यांनी सांगितले.

अन्नदाता ऍग्रो संस्थेचे उदघाटन केल्यानंतर कृषी तज्ज्ञ शिवानंद कुंभार म्हणाले, ऊस पीक हे लाभदायक पीक आहे. या पिकासाठी पाणी, खत योग्यप्रकारे पुरविण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच ऊस तोडणीनंतरदेखील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे शिवानंद कुंभार यांनी सांगितले.

ऐनापूर येथील प्रगतशील शेतकरी आणि उगार येथील ऊस उत्पादक संचालक मोहन मुतालिक बोलताना म्हणाले, ऐनापूरमध्ये पदवीधर तरुणांची संख्या अधिक आहे. अनेक युवक नोकरीच्या शोधात आहेत. अशा युवकांनी शेतीकडे लक्ष पुरविण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास उपस्थित असलेले ऐनापूर पिकेपीएस अध्यक्ष कुमार अपराज, राजेंद्र पोतदार, संजय भिरडी, दत्तात्रय कदम आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास शिवानंद कुंभार, मोहन मुतालिक, प्रवीण गणिगेर, राजू पाटील, अरुण गाणीगेर, महादेव पत्तार, अरीहंत अस्की, राजेंद्र पोतदार आदी उपस्थित होते.

Tags: