कागवाड तालुक्यातील तंगडी गावात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे २२ एकरमध्ये लावण्यात आलेला ऊस जाळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास सदर घटना घडली आहे. केपीसीसी सदस्य दिग्विजय पवारदेसाई यांच्या मालकीचा १५ एकर जागेतील ऊस, शेजारील शेतकरी नामदेव चौगुले यांचा २ एकरातील ऊस, मारुती चौगुला, तुकाराम पाटील, राम गायकवाड यांचा सुमारे १.५ एकरप्रदेशातील ऊस असा एकूण २२ एकर जागेतील ऊस जाळून खाक झाला आहे. अंदाजे ३५ लाख रुपयांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. दिग्विजय देसाई यांचे सचिव मुर्गप्पा लाटरी यांच्या लक्षात आग लागल्याचे लक्षात आले. परंतु अगदी कमी वेळेत आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. या परिसरात १० म्हशीही बांधण्यात आल्या होत्या. परंतु सुदैवाने या म्हशी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. 
सदर जागेवरील १९७२ मध्ये जोडण्यात आलेल्या विजेच्या तारा जीर्ण झाल्या आहेत. याचप्रमाणे या तारा जमिनीच्या माध्यमातून जोडण्यात आल्या असून वाऱ्याचा जोर वाढल्यास अनेकवेळा शॉर्ट सर्किटसारखे प्रकार होत असतात. यासंदर्भात संबंधित हेस्कॉम अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून याबाबत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील शेतकरी करत आहेत. हेस्कॉमच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ही दुर्घटना घडली आहे, असा आरोप नामदेव गायकवाड, मारुती चौगुला, तुकाराम पाटील, राम गायकवाड आदी शेतकऱ्यांनी केला आहे.
घटनास्थळी हेस्कॉम अधिकारी, निरीक्षण अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात अथणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची तसेच संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments