सुधारित कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मध्यवर्ती बसस्थानकासमोर टायर जाळून आंदोलन करण्यात आले.

होय, केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांना शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. शेतकऱ्यांना मारक ठरणारे हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्ली सीमेवर संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाला आज १० महिने पूर्ण झाले. तरीही केंद्र सरकार ढिम्मच आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत बेळगावात शेतकरी संघटनांनी सोमवारी आंदोलन केले. मध्यवर्ती बसस्थानकासमोर टायर जाळून आंदोलन करण्यात आले. भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्दगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी यावेळी टायर पेटवून देत निदर्शने केली. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्देगौडा मोदगी म्हणाले, संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन सुरु करून १० महिने झाले तरी केंद्र सरकार सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यास पुढे आलेले नाही. शेतकऱ्यांच्या न्यायपूर्ण मागण्यांकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्यानेच आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मागण्या मान्य न केल्यास आणखी उग्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याच्या परिणामांना केंद्र सरकारच जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांचा भारत बंदमुळे काही ठिकाणी बससंचार विस्कटला. त्यामुळे प्रवाशांची विशेषतः विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. याबाबत आपली मराठीशी बोलताना विध्यार्थ्यानी सांगितले की, आजच्या भारत बंदची आम्हाला कल्पना नव्हती. आता आम्हाला कॉलेजला जाण्यास अडचण निर्माण झाली आहे.दरम्यान, चन्नम्मा चौकातील आंदोलन, निदर्शन वगळता बेळगाव शहरात बंद काळात दैनंदिन व्यवहार नियमित सुरु होते. रिक्षा, बस संचार, दुकाने, बँक, आस्थापने, व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु राहिले.
Recent Comments