बेळगावात नुकत्याच झालेल्या बाळकृष्ण शेट्टी या पानशॉप चालकाच्या हत्येच्या निषेधार्थ बंट समाजबांधवांनी शुक्रवारी बैठक घेऊन चर्चा करून डीसीपींना निवेदन दिले.

बेळगावातील वडगावमधील लक्ष्मीनगरात बाळकृष्ण शेट्टी याचा गुटखा उधारीवर न दिल्याने एकाने चाकूने भोसकून निर्घृण खून केला होता. त्याच्या निषेधार्थ बंट समाजबांधवांनी शुक्रवारी बंटर भवनात बैठक घेऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. समाजबांधवांनी एकसंघ राहून अशा घटनांना विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी बिल्वर असोसिएशनचे सुज्जन म्हणाले, आम्ही एकसंघ राहून अविभाजित दक्षिण कन्नड जिल्ह्याचे आहोत अशी भावना बाळगली पाहिजे. आम्ही राबून खाण्यासाठी येथे आलो आहोत. सर्वानी मिळून संघटना बांधण्याची गरज आहे.
कर्नाटक हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश शेट्टी म्हणाले, अशा घटनांवरून पोलिसांचे अपयश दिसून येते. अनेक गंभीर घटनांत पोलीस तोडपाणी करण्याचा प्रयत्न करतात. त्याऐवजी त्यांनी गुन्हेगारांना सरळ करण्याचे काम केले पाहिजे.
सुधाकर शेट्टी यांनी अशा गुन्हेगारांना रस्त्याच्या मधोमध फाशी देण्याची मागणी केली.
त्यानंतर समाजाच्या ज्येष्ठांनी, कायदा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्यामुळे आम्ही सगळे मिळून कायद्यांचे पालन करूनच जगत राहू असा सल्ला दिला. त्यानंतर सर्वानी मिळून शहर पोलीस आयुक्तांच्या नावाचे निवेदन डीसीपी डॉ. विक्रम आमटे याना दिले.
Recent Comments