बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आली तर बेळगावच्या जनतेला घरफाळा आणि वाणिज्य करात ५०% सूट देण्यात येईल असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी रविवारी दिले.
बेळगाव मनपा निवडणुकीसंदर्भात शिवकुमार यांनी रविवारी बेळगावला भेट दिली. यावेळी काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गेल्या लोकसभा पोट निवडणुकीत बेळगावच्या जनतेने आम्हाला चांगला पहिमबा दिला. त्यामुळेच मी खूप विश्वासाने येथे आलोय. ती निवडणूक हरलो असलो तरी आणि केंद्रात भाजपात भाजप सरकार असूनही येथील जनतेने आमच्या उमेदवारांना अधिक मते दिली. आता मनपा निवडणुकीत आम्हला मते दिल्यास बेळगावातील जनतेला घरफाळा आणि वाणिज्य करात ५०% सूट देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
कोविड संकटात लोकांना ऑक्सिजन पुरवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. आता मनपा निवडणुकीत जाहीरनाम्यात भाजपने अंत्यसंस्कार मोफत करण्याचे वचन दिले आहे. याची त्यांना लाज वाट नाही का? असा प्रश्न शिवकुमार यांनी केला.
बेळगावात २ खासदार असून, सत्तेत येऊन २ वर्षे झाली तरी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये अधिवेशन सरकारने घेतलेले नाही. त्यामुळे यातून भाजप सरकारची उदासीनता दिसून येते अशी टीका त्यांनी केली
सिद्रामय्या सरकारच्या काळात बेळगावात तत्कालीन आ. फिरोज सेठ यांनी बसविलेले हायमास्ट पथदीप संपूर्ण राज्यात आदर्श ठरले होते. बेळगाव जिल्ह्याला आपला असा मोठा इतिहास आहे. चांगल्या शिक्षणसंस्था, हॉस्पिटल्स आहेत. बेळगावची स्पर्धा बेंगळुरसोबत झाली पाहिजे. याबाबत तुमच्या सरकारला एकदा तरी विचारणा केली का असा प्रश्न त्यांनी केला.
यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी, माजी मंत्री एम. बी. पाटील, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, गणेश हुक्केरी, अंजली निंबाळकर, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, महानगर जिल्हाध्यक्ष राजू सेठ, माजी आ. फिरोज सेठ आदी उपस्थित होते.
Recent Comments