जिकडे बघावे तिकडे भाजपचे नुसते मिशन–मिशन सुरु असते. कधी मिशन १५० तर कधी काय. बेळगाव मनपा निवडणुकीत त्यांचे मिशन ४ झाले तर आश्चर्य वाटायला नको अशा शब्दांत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी भाजपची खिल्ली उडवली.
बेळगाव मनपा निवडणुकीसंदर्भात शनिवारी काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत आ. जारकीहोळी म्हणाले, या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसने पक्षचिन्हावर लढण्याचे ठरवून उमेदवार निश्चित केले आहेत. कालपासून खऱ्या अर्थाने प्रचार सुरु केला आहे. प्रभागांची चाचपणी करून जेथे विजयाची शक्यता अधिक आहे तेथे अधिक प्रचार करण्यात येईल. ३-४ दिवस वातावरण पाहून कुठं-कुठे जिंकू शकतो हे सांगता येईल. मात्र चांगल्या प्रमाणात जागा जिंकू असा विश्वास आ. जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र एकीकरण समिती हि काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप भाजपने केला आहे त्याबाबत प्रतिक्रिया देताना आ. जारकीहोळी म्हणाले, ६ सप्टेंबरनंतर कोण-कोणाची ए, बी, सी टीम हे समजून चुकेल. त्याबाबत आता काहीच सांगता येणार नाही. म. ए. समितीशी आम्ही कसलीही बोलणी केलेली नाहीत असं त्यांनी स्पष्ट केले. एम प्लस एम सुत्राचा काँग्रेसला फायदा होईल का? या प्रश्नावर आ. जारकीहोळी म्हणाले, विजयासाठी आमच्या पक्षातर्फे आम्ही प्रयत्न करत आहोत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे एम प्लस एमचा काही संबंधच नाही.
म. ए. समिती आणि भाजपमधील भांडणाचा काँग्रेसला लाभ होणार का या प्रश्नावर काही प्रभागात निश्चित लाभ होईल असे ते म्हणाले. काँग्रेसतर्फे निवडणूक निरीक्षक म्हणून गुजरातच्या खासदार आल्या आहेत. महाराष्ट्रातील काही पक्षनेतेही येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार उद्या बेळगावात येत आहेत. काँग्रेस विधिमंडळ नेते सिद्रामय्या हे येणार नाहीत. मात्र माजी मंत्री एम. बी. पाटील, खा. एल. हनुमंतय्या, नासिर हुसेन उद्या येत आहेत. आज मी बेळगाव दक्षिण मतदारसंघात प्रचार केला, उद्या उत्तरमध्ये करणार आहे असे जारकीहोळी यांनी सांगितले.
काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मागील सिद्रामय्या सरकारमध्ये बेळगावला जाहीर केलेल्या योजना याच आमचा जाहीरनामा आहे. पक्षातर्फे एखादी नवी घोषणा झाली तर सांगू. आमचे पटक काम करत आहे. कार्यकर्त्यांची शक्ती हीच आमची शक्ती आहे. शेकडा ६० इतके अल्पसंख्यांक मतदार आहेत. त्यामुळे यावेळी जयश्री माळगी याना उमेदवारी दिलेली नाही. कोणी आमच्यासोबत आहे म्हणून नव्हे तर वस्तुस्थिती पाहून उमेदवारी दिली पाहिजे. उमेदवारी दिली अन प्रभाव झाला तर तो मोठा अपमान ठरतो असे आ. जारकीहोळी यांनी सांगितले.
Recent Comments