सरकारने लोकांमध्ये यावे यासाठी बेळगावात सुवर्णसौध उभारली आहे. त्यामुळे सरकारने बेळगावातच अधिवेशन घ्यावे अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेचे राज्याध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केली आहे.
बेळगावात बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना कोडीहळ्ळी चंद्रशेखर म्हणाले, सामान्य लोकांमध्ये सरकारने यावे आणि या भागातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवावेत यासाठी बेळगावात सुवर्णसौध उभारण्यात आली. मात्र लोकांचे प्रश्न, मागण्या आपल्यापर्यंत येऊच नयेत यासाठी येथील लोकांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांत मंत्रिमंडळ घेऊन जावे आणि स्थानिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली.
म्हादई, कावेरीसारख्या विषयांत राजकीय ड्रॅमेबाजी होऊ नये. वेळेत योजना पूर्ण करू असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र कृष्णा ट्रिब्युनलचा निकाल येऊनही पूर्ण प्रमाणात कृष्णेचे पाणी वापरण्यात त्यांना अपयश आले आहे. अजून सी स्कीमही राबवण्यास प्रारंभ केलेला नाही. आंध्रप्रदेश संपूर्ण पाण्याचा वापर करून विकासकामे करत आहे. मेकेदाटू धरण झाल्यास २६ टीएमसी पाण्याची बचत होते. त्यामुळे पायाभरणी करून हे काम सुरु करावे. म्हादई प्रश्न आंतरराज्य प्रश्न म्हणून प्रवर्तित केला आहे. गोवा सरकारने यावर प्रश्न उपस्थित करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे म्हादई, कावेरी योजनांवर सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत तर आम्हीच पायाभरणी करून कामाला प्रारंभ करू असा इशारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप व त्यांच्या अंगसंस्था कार्पोरेट कंपन्यांचे गुलाम झाले आहेत. कोणकोणत्या संस्थांना कंत्राटे देणार याची घोषणा केंद्रीय भारतमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच केली, यावरून हे सिद्ध होते अशी टीका कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केली.
एकंदर, बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घ्यावे अशी मागणी करतानाच म्हादई, कावेरी योजनांचे काम प्रारंभ न केल्यास आम्हीच पायाभरणी करून कामाला प्रारंभ करू असा इशारा कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी यावेळी दिला.
Recent Comments