बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून या उमेदवारांमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. शिवाय भाजप वरिष्ठांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात खासदार मंगला अंगडी यांची भेट घेऊन काही महिला पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हो.. नुकतीच जाहीर झालेली महानगरपालिका निवडणूक आणि त्यानंतर भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची यादी.. यामुळे काही कार्यकर्त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत पक्षश्रेष्टींविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी विश्वेश्वरय्या नगर येथील संपिगे मार्गावर असलेल्या मंगला अंगडी यांच्या कार्यालयाला भेट देत काही महिला कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
१५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. आम्ही बेळगावात पक्षाचा झेंडा धरून पक्षाचे काम केले. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षासाठीच आजवर काम केले आहे. या निवडणुकीत अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे गरजेचे होते. असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. परंतु अशा कार्यकर्त्यांना डावलण्यात येऊन इतरांना उमेदवारी देण्यात आल्याचे या महिला कार्यकर्त्यांनी मंगला अंगडी यांना सांगितले.
यावेळी उमेदवारी जाहीर न झालेल्या आरती पाटोळी, सीमा पवार, प्रियांका कलघटकर, सविता, शिल्पा केंकरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या कि, या निवडणुकीसाठी आमची नावे घेण्यात आली होती. परंतु साहेबांच्या घरी काम करणाऱ्या आणि त्यांच्या इतर नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या अनेकांना आम्ही पक्षाच्या कोणत्याही कामात पहिले नाही. अशा लोकांना उमेदवारी देऊन आमच्यावर अन्याय करण्यात आला असल्याचे या महिला कार्यकर्त्यांनी सांगितले.


Recent Comments