Belagavi

बेळगावात लशीसाठी रांगा; ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय

Share

 बेळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा पुन्हा जाणवत असल्याने मोजक्या लोकांनाच लस मिळत आहे. बीम्स इस्पितळातील लसीकरण केंद्रासमोर लस घेण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. तरीही लस मिळत नसल्याने नागरिकांची विशेषकरून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

बेळगावात बीम्ससमोर लस घेण्यासाठी रोज लांबचलांब रांगा लागत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांचीही भर पडत आहे. दहावीची परीक्षा होणार असल्याने आणि शाळा-कॉलेज सुरु होण्याच्या शक्यतेने लशीसाठी विध्यार्थी येथे येत आहेत. लस घेतल्यासच परीक्षेला आणि शाळा-कॉलेजात प्रवेश देण्यात येईल अशी अट घालण्यात आली आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाविनाच विन्मुख होऊन विध्यार्थ्यांना परतावे लागत आहे. सध्या बीम्समध्ये पहिला डोस घेणाऱ्यांना लस देणे बंद आहे केवळ १५० जणांनाच लस देण्यात येत आहे असे बीम्स प्रशासनाने सांगितले आहे. लस घेण्यासाठी लोक पहाटे ५ वाजल्यापासूनच रांग लावत आहेत. मात्र सकाळी ११ नंतर पहिला डोस घेणाऱ्यांना लस दिली जाणार नाही असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तासनतास रांग लावून उभारलेल्या विद्यार्थ्यांची, नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नाराज झालेले लोक बीम्स प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडीत विन्मुख होऊन माघारी परतत आहेत.  यासंदर्भात लस घेण्यासाठी आलेल्या विरेश या केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने सांगितले की, महाविद्यालयात लसीकरण सक्तीचे केले आहे. त्यामुळे पहिला डोस घेतला पाहिजे. मात्र येथे लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. लस घेतली नाही तर कॉलेजला प्रवेश नाही. त्यामुळे एकीकडे शिक्षणही नाही अन दुसरीकडे लशी नाही अशा दुविधेत सापडलो आहे. सरकारने कॉलेजमध्येच लसीकरणाची व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांची अशी ओढाताण होणार नाही असे त्याने सांगितले.अनगोळहून आलेल्या एका महिलेने सांगितले की, गेल्या ४ दिवसांपासून येथे येत आहे. मात्र रोजच उद्या येण्यास सांगितले जात आहे. ठराविक दिवस निश्चित करून येण्यास सांगितले तर त्यास आम्ही तयार आहोत. लस घेऊनच कामावर या असे मालक सांगतात. त्यामुळे माझी गैरसोय होत आहे. सहा दिवस धडपडल्यानंतर आता कुठे पतीला लशीचा दुसरा डोस मिळाला आहे. पण मला अजून पहिला डोस मिळालेला नाही. असे झाल्यास काय करायचे? एक तर लस घ्या म्हणून सांगतात अन लशीसाठी येथे आल्यावर लसच उपलब्ध नाही म्हणून सांगतात हा कसला न्याय? असा सवाल तिने केला.

पाटील मळा येथील रहिवासी युवकाने सांगितले की, गेल्या ४ दिवसांपासून लस घेण्यासाठी येत आहे. मात्र लस मिळत नाही हे रोजचेच रडगाणे झाले आहे. व्यवसायाने वाहनचालक असल्याने लस घेणे सक्तीचे आहे. पण लस मिळत नसल्याने घर चालवणे कठीण झाले आहे.

वडगावच्या संतोष खन्नूकर हे सकाळी ६.३० वाजल्यापासून लशीसाठी रांगेत उभे होते. त्यांना ११.४५ वाजता  आता पहिला डोस घेणाऱ्यांना लस दिली जाणार नाही असे सांगण्यात आले. साडेपाच तास प्रतीक्षा करूनही लस न मिळाल्याने त्यांनी बीम्स प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला.

अनलॉकमुळे आता कुठं जनजीवन रुळावर येण्याची चिन्हे आहेत. लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी लस घेतलेली असणे बंधनकारक केले आहे. परंतु लशीच्या तुटवड्यामुळे सर्वाना लस मिळणे कठीण झाले आहे. परिणामी रोजगाराअभावी कुटुंब चालविणे पुन्हा एकदा अशक्य होण्याची भीती आहे. किमान आता तरी मायबाप सरकारने लसीकरणातील अडथळे दूर करून सार्वत्रिक लसीकरण पार पाडावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

 

Tags: