Belagavi

“इस शहर को ये हुआ क्या? कहीं कचरा है, कहीं धुआँ-धुआँ……!

Share

बेळगावच्या रस्त्यांवर सरकारी बस आणि अवजड वाहनांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे वायुप्रदूषणासहित नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. उद्यमबागेत बसमधून धूर निघतानाचा व्हिडिओ एका नागरिकाने टिपला असून, शहरभर पसरलेल्या वाहनप्रदूषणाकडे यामुळे लक्ष वेधले गेले आहे.

“इस शहर को ये हुआ क्या? कहीं राख है, कहीं धुआँ-धुआँ… क्यूँ कोई कुछ नहीं बोलता? चुपचाप धुएँ को क्यों झेलता? हो गई बर्दाश्त की अब इंतिहा…” सिगारेट संदभात जनजागृती करणाऱ्या भारत सरकारच्या याच जाहिरातीतील या ओळी आज बेळगावच्या रस्त्यांवरील वास्तव अधोरेखित करतात. कारण शहराच्या कानाकोपऱ्यात सध्या सिगारेटमुळे नाही तर धूर सोडणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उद्यमबागेत बसमधून काळा धूर निघतानाचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. मात्र, ही समस्या केवळ एका बसपुरती किंवा उद्यमबागेपुरती मर्यादित नाही…

टीव्हीवर सिगारेटच्या जाहिराती दाखवताना धूम्रपान आरोग्यासाठी घातक असल्याचा इशारा खूद्द सरकारकडूनच दिला जातो. मात्र, रस्त्यावर धूर सोडणाऱ्या सरकारी वाहनांच्या बाबतीत आपण किती गंभीर आहोत? हे मात्र सरकार पडताळून पाहण्यात कमकुवत ठरले आहे. वाहतूक पोलीस हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना अडवतात, वाहनांची कागदपत्रे तपासतात आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतात. ही कारवाई आवश्यकच आहे; पण त्याच वेळी उघडपणे काळा धूर सोडणाऱ्या सरकारी बस आणि अवजड वाहनांवरही तितकीच तत्परता दाखवली जाते का, हा प्रश्न आहे.

ही समस्या केवळ उद्यमबागेपुरती मर्यादित नसून शहराच्या कानाकोपऱ्यात जुन्या बस, खासगी आणि अवजड वाहनांच्या धुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. इंजिनमधील बिघाड आणि अपुऱ्या देखभालीमुळे निघणाऱ्या काळ्या धुरातील सूक्ष्म कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचून श्वसनविकार, हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वाहनप्रदूषणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

उद्यमबागेतील व्हिडिओने समोर आणलेला प्रश्न म्हणूनच एका बसपुरता मर्यादित नाही. प्रदूषण नियंत्रणाचे नियम सामान्य नागरिकांबरोबरच सरकारी परिवहन महामंडळाच्या वाहनांनाही समानपणे लागू झाले पाहिजेत. बेळगावकरांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी परिवहन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने कारवाई करणे ही आता काळाची गरज आहे.

Tags: