Belagavi

केएलई संस्थेचा १११ वा वर्धापन दिन उत्साहात

Share

बेळगाव येथील केएलई संस्थेचा १११ वा वर्धापन दिन व गुणवंतांचा सत्कार सोहळा जेएनएमसी आवारातील सेंटेनरी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला.

उद्घाटनपर भाषणात प्रा. देसाई यांनी संस्थेची उभारणी करणाऱ्या सप्तर्षींच्या त्यागाचे स्मरण केले. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वात संस्थेने दहापटीने प्रगती साधल्याचे गौरवोद्गार प्रमुख पाहुणे आयआयटी धारवाडचे संचालक प्रा. वेंकप्पय्या आर. देसाई यांनी काढले. संगणक विज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचे मूल्यवर्धन आणि ‘सा विद्या या विमुक्तये’ या तत्त्वाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

प्रास्ताविकात व्यवस्थापन मंडळाचे कार्याध्यक्ष अमित पी. कोरे यांनी १९१६ मध्ये सात शिक्षक आणि तीन दात्यांनी सुरू केलेल्या संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेतला. पूर्वी केवळ ३० ते ३२ संस्था असलेले हे रोपटे डॉ. कोरे यांच्या दूरदृष्टीमुळे आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात विस्तारले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करण्यासोबतच ५,५०० हून अधिक खाटांच्या रुग्णालयांद्वारे माफक दरात आरोग्यसेवा व जागतिक दर्जाच्या संशोधनावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षण, क्रीडा, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष महांतेश एस. कौजलगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आजीवन सदस्य मंडळाचे कार्याध्यक्ष एस. जी. नंजप्पनवर आणि व्यवस्थापन मंडळाच्या सचिव डॉ. सुनीला एस. जलालपुरे उपस्थित होत्या.

Tags: