Belagavi

बेळगावच्या स्थानिक उत्पादनांना मिळणार जागतिक बाजारपेठ

Share

बेळगावमधील स्थानिक हस्तकला आणि औद्योगिक उत्पादनांना जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी भारतीय डाक विभागाचे ‘डाक घर निर्यात केंद्र’ (DNK) अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

बेळगाव डाक विभाग आणि बेळगाव चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयात-निर्यातदार विशेष बैठकीत ते बोलत होते. पूर्वी केवळ पत्रे पोहोचवणारा डाक विभाग आज स्थानिक उत्पादक आणि उद्योजकांच्या सक्षमीकरणाचे मोठे माध्यम बनल्याचे त्यांनी नमूद केले. जगातील २०० हून अधिक देशांमध्ये स्वस्त दरात माल पोहोचवण्याची सुविधा, सोपी कागदपत्र प्रक्रिया आणि ई-कॉमर्सच्या उपायांमुळे लघु व मध्यम उद्योगांना मोठी मदत होणार असून, स्थानिक निर्यातदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

बेळगावचे फाउंड्री उद्योग, इंजिनियरिंग साहित्य, शहापूर साड्या आणि कृषी उत्पादनांमध्ये मोठी क्षमता असून, डाक विभागाच्या या सुविधेमुळे आता स्थानिक खाद्यपदार्थ व हस्तकला वस्तू थेट बर्लिन, पॅरिस आणि अमेरिकेपर्यंत पोहोचवणे सुलभ झाले असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बेळगाव येथे पार पडलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव विभागाच्या वरिष्ठ डाक अधीक्षक आरुषी शर्मा पी. एल. श्रीदेव आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष स्वप्नील शहा होते. या कार्यक्रमास बेळगाव जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर धारवाड प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक संचालक आर. वाय. मधुसागर, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या डाक समितीचे अध्यक्ष रोहित कपाडिया, बेंगळुरू सीपीएमजी कार्यालयाचे आंतरराष्ट्रीय डाक निरीक्षक रूपेश कुमार के. एन., एचसीएसएसचे अध्यक्ष आणि ईपीएचसीचे सह-संयोजित सदस्य के. एल. रमेश तसेच धारवाड डीसी(एच) चे सहाय्यक संचालक श्री किरण विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

Tags: