Belagavi

भारत विकास परिषदेचा दिवाळी मिलन सोहळा उत्साहात संपन्न!

Share

बेळगाव येथे भारत विकास परिषदेतर्फे दिवाळी मिलन सोहळा उत्साहात पार पडला. सेवाकार्य आणि सांस्कृतिक उपक्रमांचा संगम असलेल्या या सोहळ्यात राष्ट्रीय समूहगान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला परिषदेचे दक्षिण भारत विभागीय अध्यक्ष राजन वालियाथन, राज्य प्रभारी सुहास चांडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सामूहिक वंदे मातरम् गायन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत केले, तर संस्थापक अध्यक्ष प्राचार्य व्ही. एन. जोशी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत यश संपादन केलेल्या ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षिका अक्षता मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी परिषदेच्या विविध सेवाकार्यांचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या महत्त्वाचा आढावा घेतला. त्यानंतर रांगोळीभोवती दीपप्रज्वलन करून दीपावलीचा आनंद साजरा करण्यात आला. पुढे रंगलेल्या बहारदार संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रा. अरुणा नाईक यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. मान्यवर, महिला पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा स्नेहमेळावा एकता, संस्कृती आणि संघटनात्मक बांधिलकीचा संदेश देत उत्साहात संपन्न झाला.

Tags: