दिवाळीच्या उत्सवी वातावरणात बेळगाव महानगरपालिका कार्यालयाला बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. अनामिक ई-मेलद्वारे कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढून पोलिसांनी तपासणी सुरू केली.

सकाळी कार्यालयीन वेळेत महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाला हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. महानगरपालिका कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला होता. याची माहिती मिळताच महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाचे गटनेते संतोष पडणेकर आणि अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. खबरदारी म्हणून कार्यालयात उपस्थित असलेले सर्व कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा करण्यात आला.


घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक काळीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक, बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकांकडून संपूर्ण कार्यालयाची तपासणी करण्यात येत आहे.

आयुक्तांचे दालन, महसूल विभाग, विभागीय कार्यालय, आरोग्य विभाग तसेच तळमजल्यावरील महापौर आणि उपमहापौर यांची दालने आणि सभागृहाची कसून तपासणी सुरू आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शोधमोहीम सुरूच आहे.


Recent Comments