दिवाळीचा सण जवळ येताच सांस्कृतिक नगरी बेळगावमध्ये ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची लगबग सुरू झाली आहे. विविध ठिकाणी बालचमू महाराजांच्या शौर्याचा आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचा वारसा किल्ल्यांच्या माध्यमातून जिवंत करत आहेत.

दिवाळी आली की बेळगावातील गल्लीगल्लीत मुले एकत्र येऊन हिंदवी स्वराज्याचा इतिहास दर्शविणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतात. दुर्गदुर्गेश्वरी रायगड, तोरणगड, प्रतापगड, अजिंक्यतारा, सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत मुले आपले कलाकौशल्य दाखवतात. अनेक संस्था अशा सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करून मुलांना प्रोत्साहन देतात. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.


बेळगावच्या विविध भागांत मुले आणि तरुण मित्रमंडळींसोबत कित्येक महिन्यांपासून किल्ल्यांच्या निर्मितीत व्यस्त आहेत. गवळी गल्लीमध्ये प्रतापगड, कंग्राळ गल्लीमध्ये पद्मदुर्ग, तर पांगुळ गल्लीमध्ये रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या मेहनतीतून उभारलेल्या या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आकाशातून पाहिल्यास फुलपाखराच्या आकारासारखा दिसणारा प्रतापगड आणि पाण्यात उठून दिसणारा पद्मदुर्ग यांसारख्या किल्ल्यांच्या प्रतिकृती विशेष आकर्षण ठरत आहेत. विविध दिवशी या किल्ल्यांचे उद्घाटन केले जात असून, त्यामुळे बेळगावमधील दिवाळीच्या उत्साहात भर पडली आहे.

दिवाळीत किल्ले उभारणे, त्यांचे पूजन करणे आणि दीपोत्सव साजरा करण्यामागे ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले जाते. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवत अमावास्येच्या दिवशी अनेक महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतल्याची आठवण या परंपरेशी जोडली जाते. हिंदवी स्वराज्यात मुघलांच्या अत्याचारातून प्रजेची मुक्तता होऊन त्यांच्या जीवनात नव्या प्रकाशाची पहाट उगवल्याच्या स्मरणार्थ किल्ल्यांवर हजारो पणत्या लावून विजयाचा उत्सव साजरा केला जात असे. ही परंपरा आजही सुरू असून, किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि दीपोत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.


Recent Comments