बेळगाव जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य न देता परराज्यांतील उमेदवारांना संधी दिली जात असल्याचा आरोप करत कित्तूर कर्नाटक सेनेने आंदोलन केले.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.


जिल्ह्यातील हिंडलगा परिसरासह विविध औद्योगिक क्षेत्रांतील कारखान्यांमध्ये स्थानिकांना डावलले जात असल्याचा आरोप संघटनेने केला. केवळ कामगारच नव्हे, तर पर्यवेक्षक, व्यवस्थापक, मनुष्यबळ विभाग आणि व्यवस्थापकीय संचालक यांसारख्या वरिष्ठ पदांवरही राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातील व्यक्तींची नियुक्ती केली जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
काही कारखान्यांतील परभाषिक अधिकारी कन्नड भाषिक कामगारांवर अन्याय करत असून, त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना कामावरून कमी केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
कामगार विभागाचे कामकाज केवळ नावापुरते सुरू असल्याचा आरोप करत कारखानदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळते की नाही, याची तपासणी कामगार आयुक्तांनी करावी, तसेच पर्यावरण प्रदूषण करणारे कारखाने स्थलांतरित करावेत, अशी मागणी करण्यात आली.
राज्य सरकारने कन्नड शाळांचे खासगीकरण करण्याचा विचार सोडून सीमाभागात नव्या कन्नड शाळांना मंजुरी द्यावी आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महेश शिगिहळ्ळी यांनी केली.
मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.


Recent Comments