ऑनलाइन पैशांच्या व्यवहाराच्या नावाखाली बनावट नोटा दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बेळगाव सीसीबी पोलिसांनी पर्दाफाश केला. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी तपास सुरू आहे.
७ नोव्हेंबर २०२६ रोजी सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शांतिनगर येथील अशोक मरेप्पा तवनाचे यांच्या घराच्या तळमजल्यावर छापा टाकण्यात आला.

मार्स इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे पाच कोटी रुपये व्हाइट मनी स्वरूपात देण्याचे आणि त्याबदल्यात तीन कोटी रुपये ब्लॅक मनी स्वरूपात रोख घेण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू होता. याप्रकरणी शिवलिंगय्या राजय्या गणाचारी, सागर लक्ष्मण किळकेते आणि विनायक गणपती नोकारे यांना ताब्यात घेण्यात आले.
याशिवाय, मुलांच्या खेळण्यातील नोटा खऱ्या असल्याचे भासवून ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले. या प्रकरणाशी संबंधित शिवानंद कल्लाप्पा मुनवळ्ळी याच्यासह एकूण संशयितांकडून ३५ हजार रुपये रोख, मोबाईल आणि बनावट बँक स्टेटमेंट जप्त करण्यात आले. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments