Belagavi

कोल्हापूरच्या अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयवदानातून सहा गरजू रुग्णांना नवजीवनाची संधी आधार रुग्णालयात अवयवदान ब्रेन डेड तरुणाच्या अवयवदानामुळे ६ जणांना जीवनदान

Share

 

कोल्हापूर येथील अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयवदानातून सहा गरजू रुग्णांना नवजीवनाची संधी आधार रुग्णालयात ब्रेन डेड घोषित झालेल्या २२ वर्षीय कृषी शास्त्राच्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सहा जणांना नवीन आयुष्य मिळाले आहे.

कोल्हापूर येथील रहिवासी आणि कृषी महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असलेला प्रणव संभाजी कुंभार हा मैदानावर खेळल्यानंतर अचानक चक्कर येऊन कोसळला. त्याला तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. या कठीण प्रसंगात प्रणवच्या आईने व कुटुंबीयांनी धीर दाखवत अवयवदानाला संमती दिली. त्यानुसार प्रणवचे दोन मूत्रपिंड (किडनी), यकृत (लिव्हर), फुफ्फुस आणि दोन डोळ्यांच्या बाहुल्या (कॉर्निया) दान करण्यात आल्या. एक मूत्रपिंड अॅस्टर आधार रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड ग्रीन कॉरिडोअरद्वारे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकला पाठवण्यात आले. फुफ्फुस एअर अॅम्ब्युलन्सने चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात, तर यकृत पुण्याच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात पोहोचवण्यात आले.

या अवयवदान प्रक्रियेत झेडटीसीसी (ZTCC) समन्वयक डॉ. आरती गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली अॅस्टर आधार रुग्णालयाची वैद्यकीय टीम, चेन्नईचे एमजीएम रुग्णालय, पुण्याचे आदित्य बिर्ला रुग्णालय व डी. वाय. पाटील रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) डॉ. उल्हास दामले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) डॉ. डॅलन फर्नांडिस यांनी प्रणवच्या कुटुंबाच्या त्यागाचे कौतुक करत त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.

डॉक्टर आणि वैद्यकीय टीम: डॉ. धनसागर वाकळे, डॉ. युवराज सावंत, डॉ. भूपेंद्र पाटील, डॉ. अजय केणी, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. निधी भोसले, डॉ. अभिजित गवळी, डॉ. मयुरा पुजारी.

Tags: