Belagavi

काकती किल्ल्याच्या विकासासाठी पर्यायी जागेचा विचार; पालकमंत्री

Share

काकती येथील किल्ला वन विभागाच्या हद्दीत असल्याने तेथील विकासकामांत अडचणी येत आहेत. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास किल्ला आणि परिसराच्या विकासासाठी योग्य पावले उचलली जातील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

बेळगाव तालुक्यातील काकती येथे जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच कित्तूर राणी चन्नम्मा उत्सव समितीच्या वतीने आयोजित कित्तूर राणी चन्नम्मा विजयोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रातील सरकारी उपक्रमांचा उल्लेख करताना त्यांनी यमकनमर्डी मतदारसंघात २५० शाळांच्या खोल्यांचे काम पूर्ण झाले असून, आगामी काळात आणखी ३०० वर्गखोल्या बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. महिलांना योग्य प्रोत्साहन आणि दर्जेदार शिक्षण दिल्यास त्या समाजाची मोठी संपत्ती ठरतील, असेही ते म्हणाले.

यावेळी वक्त्या रजनी जिरग्याळ यांनी राणी चन्नम्मा यांच्या जीवनप्रेरणेचा उल्लेख करत मुलींना समान संधी आणि शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार आसिफ सेठ यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले विचार मांडले.

कार्यक्रमाला भूतरामनहट्टीचे तपोरत्न शिवसिद्ध महास्वामीजी, काकती शिवपूजीमठाचे शिवसिद्ध राचय्या स्वामीजी आणि काकती उदय हिरेमठ स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पालिका आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी, वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचे जन्मस्थान असलेल्या काकती येथे २०२ व्या कित्तूर विजयोत्सवाचा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी चन्नम्मा ज्योतीला नमन करून, कबुतरे आणि फुगे आकाशात सोडून उत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी सादर झालेल्या विविध लोककला पथकांच्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली.

Tags: