Belagavi

वायव्य वाहतूक महामंडळाच्या क्रीडा आणि कला महोत्सवाचा बेळगावात शुभारंभ

Share

आरोग्यदायी जीवनासाठी प्रत्येकाने क्रीडा आणि शारीरिक उपक्रमांसाठी दररोज वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन बेळगाव परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक शशिधर मरिदेवरमठ यांनी केले.

शहरातील जिल्हा क्रीडांगणावर गुरुवारी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बेळगाव विभागातील कामगार व कल्याण शाखेच्या वतीने आयोजित २०२६-२७ या वर्षाच्या विभागस्तरीय ‘क्रीडा आणि कला महोत्सवाच्या’ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

दैनिक कामाच्या ताणतणावातून सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी खेळ आणि व्यायाम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. जिद्द आणि सहभाग हीच खेळातील खरी यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या क्रीडा महोत्सवात कर्मचाऱ्यांसाठी १०० मीटर, २०० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी यासह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून कर्मचाऱ्यांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

या वेळी विभागीय तांत्रिक अभियंता नितीन गडदे, विभागीय लेखाधिकारी संजय मासुमळी, विभागीय सुरक्षा अधिकारी दशरथ केळगेरी, कामगार कल्याण अधिकारी प्रकाश नायक, विधी अधिकारी के. जी. श्रुती, आगार व्यवस्थापक विजयकुमार कुमटळ्ळी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी विद्या कांबळे, क्रीडा समिती सदस्य सुरेश एरड्डी यांच्यासह महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: