बेळगाव महानगरपालिकेत कन्नड ठराव मंजूर करण्यास विलंब करणाऱ्या महापौर आणि उपमहापौरांना राज्योत्सव कार्यक्रमाचे आमंत्रण देऊ नये, असा आक्षेप कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वतयारी बैठकीत नोंदवला. या मुद्द्यावरून बैठकीत कन्नड कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन काही जणांनी सभात्याग केला.

गुरुवारी जिल्हा परिषद सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली राज्योत्सव पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कन्नड कार्यकर्ते बळराम मासेनेट्टी यांनी महापौर व उपमहापौरांना राज्योत्सवाचे आमंत्रण देण्यास विरोध केला. मात्र, करवे (नारायणगौडा गट) अध्यक्ष सुरेश गवन्नवर यांनी महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांना प्रोटोकॉलनुसार आमंत्रण दिलेच पाहिजे, अशी भूमिका घेतली.


या वादात मध्यस्थी करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले की, शासकीय नियमांनुसार आणि प्रोटोकॉलप्रमाणेच महापौर व उपमहापौरांना निमंत्रण धाडले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर करवे (शिवरामेगौडा गट) जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकुडी आणि मासेनेट्टी यांनी आक्षेप घेतला. कन्नडविरोधी लोकप्रतिनिधींना राज्योत्सवाचे आमंत्रण देणे योग्य नाही, असा दावा करत त्यांनी सुरेश गवन्नवर यांच्याशी हुज्जत घातली आणि बैठकीतून बाहेर पडले.

बैठकीतून सभात्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांना परत येण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी म्हणाले, “येथे उपस्थित सर्व कन्नड भाषिक एकच आहेत. राज्योत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपल्या सूचना मांडणे गरजेचे आहे.”


Recent Comments