Belagavi

बेळगावात राज्योत्सवाच्या पूर्वतयारीची प्रशासकीय लगबग

Share

बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असून सीमा आणि अधिकारांबाबत महाजन अहवालातील सर्व शिफारसी मान्य करण्यात आल्या आहेत. बेळगाव महानगरपालिकेच्या या वादग्रस्त ठरावामुळे पुढील कायदेशीर लढ्याला बळ मिळाल्याचा दावा करत, यंदाचा राज्योत्सव अत्यंत दिमाखात साजरा केला जाईल, असे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

आज बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्योत्सवाची पूर्वतयारी बैठक पार पडली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, बेळगाव कर्नाटकाचाच भाग आहे आणि महाजन अहवालातील सर्व मुद्दे मान्य करण्यात आले आहेत. महापालिकेच्या ठरावाचा दाखला देत त्यांनी या लढ्यात सहभागी कन्नड संघटनांचे आभार मानले. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, स्थानिक पातळीवरही बेळगाव कर्नाटकाचा भाग असल्याचे दडपशाहीने सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

या बैठकीत विविध कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. मिरवणुकीत चित्ररथ, दुकानांच्या फलकांवर कन्नड भाषेची सक्ती आणि ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर या मुद्द्यांवर त्यांनी दबाव आणला. मराठी भाषिकांवर भाषिक सक्ती लादण्याच्या या प्रयत्नांना प्रशासनानेही मूक संमती दिल्याचे दिसून आले.

या बैठकीस विविध कन्नड संघटनांचे कार्यकर्ते, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, अतिरिक्त जिल्हाधिकारी एन. व्ही. बरमनी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags: