Belagavi

बेळगावमधील एमीनंट कोचिंग क्लासमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Share

बेळगावच्या महांतेश नगरमधील एमीनंट कोचिंग क्लासमध्ये ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष देशभक्तिपर कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाने वातावरण राष्ट्रप्रेमाने भारून गेले होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंजुनाथ कौलगी यांनी, स्वातंत्र्य ही केवळ शब्दांची गोष्ट नसून प्रत्येकाची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. देशासाठी प्राण अर्पण केलेल्या थोरा-मोठ्यांचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी शिक्षण, विज्ञान आणि समाजकार्यात योगदान देऊन नवभारत निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुलांच्या यशातच संस्थेची खरी प्रतिष्ठा असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या संस्थापक सचिव सौ. भाष्यलक्ष्मी एम. कौलगी यांनी, स्वातंत्र्य ही क्रांतिकारकांच्या बलिदानाची अमूल्य शिदोरी असून कर्तव्याची निष्ठावान पूर्ती करणे हाच खरा देशसन्मान असल्याचे सांगितले. तसेच प्रशासकीय अधिकारी सिद्धानंद बडूर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे मोल आणि युवकांची कर्तव्ये यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात चिमुकल्यांच्या नृत्याविष्कारासह देशभक्तीपर गीते आणि भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. यादरम्यान आयोजित गायन, भाषण व निबंध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

या सोहळ्यात कोचिंग क्लासचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता बोमण्णवर यांनी केले, स्वागत संजीव दावणी यांनी, बक्षीस वितरण स्वाती कट्टीमनी यांनी तर आभार लक्ष्मी शहाबादी यांनी मानले.

Tags: