Belagavi

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी रमाकांत कोंडुस्करांचा अल्टिमेटम

Share

बेळगाव शहरातील रस्ते आगामी गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त न केल्यास महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक तथा अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर यांनी दिला आहे.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. खराब रस्ते, एलअँडटी कंपनीचे कामकाज आणि ई-आस्ती प्रमाणपत्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वसुलीबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. शहरातील विविध भागांत रस्ते खराब झाल्यामुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्त्यांच्या दुर्दशेमुळे अपघात होत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट सिटी योजना आणि उदमीबाग उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून अनेक रस्ते काही महिन्यांतच खराब झाल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शहरात एलअँडटी कंपनीकडून चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही शुल्काची आवश्यकता नसताना काही भागात नागरिकांकडून बेकायदेशीर पैसे उकळले जात आहेत. तसेच, पालिकेच्या वतीने ई-आस्ती प्रमाणपत्र देण्यासाठी अल्प खर्च असतानाही गरिबांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लहान घरांच्या दुरुस्तीसाठी त्रास देणारे अधिकारी या मोठ्या भ्रष्टाचाराविरोधात गप्प बसल्याचे ते म्हणाले.

शास्त्री नगरातील नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दिल्यावर रस्ते दुरुस्ती सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Tags: