Belagavi

सरदार हायस्कूलच्या आवारात ‘चेस पार्क’चे उद्घाटन

Share

बेळगाव येथील ऐतिहासिक सरदार हायस्कूलच्या आवारात नवनिर्मित नाविन्यपूर्ण ‘चेस पार्क’चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक खेळांची आवड निर्माण करणे आणि त्यांची एकाग्रता वाढवणे या उद्देशाने या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण झाले.

उत्तर बेळगावचे आमदार असिफ शेठ यांच्या २०२५-२६ च्या आमदार निधीतून (KLLADS) आणि जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून या चेस पार्कची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटनानंतर पालकमंत्री आणि आमदारांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ (चेस) खेळून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

शाळेच्या वेळेनंतर विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर किंवा इतरत्र वेळ वाया न घालवता बौद्धिक खेळांकडे वळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. येथे बुद्धिबळ आणि कॅरम खेळण्यासाठी उत्तम वातावरण निर्मिती करण्यात आली असून आगामी काळात शाळा स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल शिंदे यांनी दिली.

सध्या या पार्कचा उपयोग सरदार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने केला जात असला, तरी नागरिक व बुद्धिबळ प्रेमींना सदस्यत्व (Membership) देऊन प्रवेश दिला जाईल. तसेच बेळगाव जिल्ह्यात पंचायत स्तरावरही अशी चेस पार्क्स उभारण्याचा मानस आहे.

या सोहळ्यास असिस्टंट कमिशनर (AC) श्रवणकुमार नायक, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस अधीक्षक (SP) के. रामराजन आणि गटशिक्षण अधिकारी (BEO) लीलावती हिरेमठ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

Tags: