Belagavi

विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम

Share

बेळगाव शहरातील नामवंत बेळगाव रुरल इंडस्ट्रीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जिजामाता चौक, फोर्ट रोड यांच्या सौजन्याने चव्हाट गल्ली, बेळगाव येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा क्रमांक ५ येथे गुरुवारी सायंकाळी ठीक ४ वाजता शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या पूजनाने झाली. सोसायटीचे चेअरमन मारुती सदावर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर व्हाईस चेअरमन चेअरमन शिवाजी शहापूरकर सोसायटीचे संचालक किसन रेडेकर मिलिंद पावशे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांनी केले.

यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री मारुतीराव सदावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकांना आवाहन केले की, आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. प्रत्येक मूल हे विशेष असते. त्याच्यामध्ये दडलेले सुप्त गुण ओळखून त्याला आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा द्या.तसेच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

संचालक कृष्णराव मोदगेकर यांनी एखाद्या विद्यार्थ्याला आर्थिक अडचण येत असेल तर त्यांनी कोणताही संकोच न करता सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्याशी संपर्क साधावा.आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी शक्य ती मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मोदगेकर यांनी यावेळी दिली.

सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिकेल तो टिकेल हा संदेश दिला. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून आयुष्यात मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले.एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत ३५ टक्के गुण मिळाले तरी त्याने निराश होऊ नये. अपयश आले म्हणून थांबायचे नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास करून मोठे यश मिळविण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे असे सुनील जाधव यांनी सांगितले.

यानंतर चव्हाट गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते व सोसायटीचे संचालक किसन रेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ शालेय अभ्यासावर लक्ष न देता विविध कलाक्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रातही उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे. कोणताही विद्यार्थी मागे राहता कामा नये. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला विकसित करून बदलत्या काळाशी जुळवून घेतले पाहिजे.असे रेडेकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक मुचंडीकर यांनी उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव सोसायटीचे संचालक,चेअरमन श्री मारुतीराव सदावर व्हाईस चेअरमन शिवाजी शहापूरकर विद्यमान संचालक कृष्णराव मोदगेकर किसन रेडेकर मिलिंद पावशे रमेश मोदगेकर मल्लाप्पा चौगुले रघुनाथ पाटील जनरल सेक्रेटरी विनायक गोदे शाळेतील शिक्षकवर्ग, पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी एस माळी सर यांनी आभार प्रदर्शन केले

Tags: